केंद्र सरकारचा मोठा निर्णय: सबसिडीच्या सिलिंडर संख्येत कपात;
देशातील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या सबसिडीच्या (अनुदानित) एलपीजी (LPG) सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सिलिंडरचा कोटा कमालीचा घटला असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
नऊवरून थेट चार सिलिंडरवर आणली मर्यादा
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यापूर्वी या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी नऊ सिलिंडर सबसिडीसह मिळत होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार ही संख्या नऊवरून थेट चारवर आणण्यात आली आहे. म्हणजेच, आता लाभार्थ्यांना वर्षभरात केवळ चारच सिलिंडरवर अनुदान मिळणार आहे.
स्वयंपाकघराचे बजेट कोलमडणार?
वर्षाला फक्त चार सिलिंडर सबसिडीवर मिळणार असल्याने, सर्वसामान्य कुटुंबांची चिंता वाढली आहे. एका सरासरी कुटुंबाला वर्षाकाठी किमान ७ ते ८ सिलिंडरची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत, कोट्यातील ४ सिलिंडर संपल्यानंतर उर्वरित सिलिंडर लाभार्थ्यांना बाजारातील मूळ दराने म्हणजेच विनासबसिडी खरेदी करावे लागणार आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना आर्थिक फटका
आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना धूरमुक्त स्वयंपाकघराचा आधार मिळाला होता. मात्र, सबसिडीच्या सिलिंडर संख्येत झालेल्या या कपातीमुळे लाभार्थ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक भार वाढणार असून, या निर्णयावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








