पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; हजारो किलो संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त


पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; हजारो किलो संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने पुणे शहरात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात संशयित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांची तपासणी अधिक कडक करण्यात आली असून ही मोहीम एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
एफडीएच्या पथकांनी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे १३,१२७ किलो खवा, २,८०६ किलो पनीर, ९६० किलो तूप आणि १३८ किलो चीज ॲनालॉग असा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या पदार्थांची अंदाजे किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएने दिली.
“ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
एफडीएने नागरिकांना दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना उत्पादनाची तारीख, पॅकिंग आणि गुणवत्ता तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!