शेतीच्या बांधावरील वादातून तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा:-


शेतीच्या बांधावरील वादातून तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा:-

जि. सोलापूर, ता.पंढरपूर:दि. 12 जून :-पंढरपूर तालुक्यातील पाढरेवाडी येथे शेतीच्या बांधावरील वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईकांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाढरेवाडी येथील तानाजी नवनाथ यादव (वय ३२) हे शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. यावेळी गट क्रमांक ५८ मधून जाणाऱ्या रस्त्यावर शेजारील शेतातील एक दगड पडलेला होता. तानाजी यादव यांनी तो दगड उचलून बांधावर ठेवला. यावरून शेजारील शेतकरी महादेव विश्वनाथ जमदाडे व सदाशिव विश्वनाथ जमदाडे यांच्याशी वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप असून, दोघांनी तानाजी यादव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तानाजी यादव यांच्यावर यापूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती आणि ही बाब संबंधितांना माहिती होती, असा आरोपही करण्यात आला आहे.

मारहाणीनंतर तानाजी यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने करकंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, मृताच्या पत्नी पूजा यादव व नातेवाईकांनी करकंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात विलंब होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या काही नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) प्रशांत डगळे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!