पावसाळ्यात खोदकामाला विशेष परवानगी; स्मार्ट सिटीच्या कामांवर सुलभा उबाळे यांचा आक्षेप.


पावसाळ्यात खोदकामाला विशेष परवानगी; स्मार्ट सिटीच्या कामांवर सुलभा उबाळे यांचा आक्षेप

‘अपघात झाल्यास जबाबदारी आयुक्त घेणार का?’ असा थेट सवाल

पिंपरी, दि. ३ जुलै : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पावसाळ्यात सर्वसाधारणपणे खोदकामांवर बंदी घातली असतानाही स्मार्ट सिटी कंपनीला तब्बल ३८ किलोमीटर खोदकामासाठी विशेष परवानगी दिल्याच्या निर्णयावर नगरसेविका तथा शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

सुलभा उबाळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, महापालिकेच्या नियमानुसार दरवर्षी १५ मे ते १५ ऑक्टोबर या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या खोदकामास परवानगी दिली जात नाही. मात्र, स्मार्ट सिटीच्या कामांसाठी याच कालावधीत अपवादात्मक स्वरूपात परवानगी देण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत उघड्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत, तसेच मुंबईतील तत्सम दुर्घटनांचा उल्लेख करत, पिंपरी-चिंचवडमध्येही अशी घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन स्वीकारणार का, असा थेट सवाल उबाळे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत महापालिका प्रशासनाने माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, पावसाळ्यात सुरू असलेल्या खोदकामांबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अप्रत्यक्ष मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या खोदकामांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, महापालिका प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी:  शाम शिरसाठ पुणे


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!