उल्हासनगरमध्ये भीषण ‘हिट अँड रन’; भरधाव कारने वृद्धाला चिरडले, १ ठार, १ गंभीर जखमी
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये रविवारी भीषण ‘हिट अँड रन’ची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात जखमी वृद्धाच्या अंगावर पुन्हा कार घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश प्रकाश मुथा याने भरधाव कारने देवेंद्र सिंह राजपूत (वय ६५) आणि त्यांचा मुलगा संजय सिंह यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवेंद्र सिंह राजपूत यांच्या अंगावर आरोपीने कार घालून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या भीषण घटनेत देवेंद्र सिंह राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय सिंह गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी अविनाश प्रकाश मुथा याला अटक केली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे वडील प्रकाश मुथा हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातावेळी वाहनाचा वेग, नेमकी परिस्थिती आणि चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






