राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावीतचे सुवर्णयश; आई-वडिलांना विजयाची बातमी शिक्षकांकडून समजली
नाशिक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पॅरा धावपटू दिलीप महादू गावीत याने पुरुषांच्या टी-४७ गटातील १०० मीटर शर्यतीत १०.७१ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. या शर्यतीत महाराष्ट्राच्याच मोहम्मद बासिल याने रौप्यपदक जिंकत भारताला दुहेरी यश मिळवून दिले.
दिलीप गावीतच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे एक भावनिक बाजूही समोर आली आहे. दिलीपच्या गावात वीजपुरवठा नसल्याने त्याच्या आई-वडिलांना मुलाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याची माहिती तत्काळ मिळू शकली नाही. ही आनंदाची बातमी त्यांना गावातील शिक्षकांकडून समजली.
लहानपणापासून शाळेत जाताना रोज धावत जाणारा दिलीप आज आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करत आहे. त्याच्या यशामुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







