पुणे रेल्वे स्टेशन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; प्रवाशाची लॅपटॉप, मोबाईल व ₹३० हजारांसह बॅग सुरक्षित परत
पुणे :पुणे रेल्वे स्टेशन परिसरात कर्तव्य बजावत असताना दाखवलेल्या सतर्कतेमुळे रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाची मौल्यवान बॅग सुरक्षितपणे शोधून परत करत प्रामाणिकपणा आणि तत्परतेचे उत्तम उदाहरण घालून दिले.
दिल्ली येथील रहिवासी ओंकार पाटील हे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आपली स्कायबॅग कंपनीची बॅग विसरून गेले होते. या बॅगमध्ये लॅपटॉप, मोबाईल तसेच ₹३० हजारांची रोख रक्कम होती. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर एएसआय मुसळे आणि महिला पोलीस हवालदार थोरात (बकल क्रमांक १३६१) यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
या शोधकार्यात कोंढवा येथील रिक्षाचालक शोएब बागवान यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पोलिसांची तत्परता आणि रिक्षाचालकाच्या प्रामाणिक सहकार्यामुळे बॅग अल्पावधीतच शोधून काढण्यात आली. बॅगमधील सर्व ऐवज आणि रोख रक्कम सुरक्षित असल्याची खात्री करून ती प्रवासी ओंकार पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली.
आपली मौल्यवान बॅग सुखरूप परत मिळाल्यानंतर ओंकार पाटील यांनी पुणे रेल्वे स्टेशन पोलिसांचे तसेच रिक्षाचालक शोएब बागवान यांचे मनापासून आभार मानले. पोलिसांची सतर्कता आणि एका सामान्य नागरिकाने दाखवलेला प्रामाणिकपणा यामुळे समाजात विश्वासाचे सकारात्मक उदाहरण निर्माण झाले असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







