भिवंडीत धोकादायक ‘कोहीनूर’ इमारत कोसळली; ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून बचावकार्य सुरू
भिवंडी:भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसर गुरुवारी (३० जुलै) रात्री उशिरा एका मोठ्या अपघाताने हादरला. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच ‘धोकादायक’ म्हणून घोषित केलेली ‘कोहीनूर इमारत’ (तळमजला अधिक ४ मजले) अचानक कोसळली. या दुर्घटनेत इमारतीच्या ‘बी विंग’चा भाग पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली आला असून, ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८.०० ते ९.०० वाजताच्या सुमारास इमारतीमधून मोठ्याने कर…कर…कट…कट असा आवाज येऊ लागला. कोणताही धोका पत्करायचा नाही म्हणून स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत इमारतीतील अनेक कुटुंबांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या दरम्यान काही नागरिक व कामगार बाहेर पडत असतानाच इमारतीचा ‘बी विंग’ भाग अचानक कोसळला.
अनेक जण ढिगाऱ्याखाली
या इमारतीत एकूण ४८ खोल्या होत्या. दुर्घटनेच्या वेळी डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये शामजी पाल (वय ४६), संतोष पांडे उर्फ मुन्ना (वय ४२), मिराज शेख (वय ३५) यांच्यासह काही कामगारांचा समावेश आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, भोईवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी श्री. भोजणे, माजी नगरसेवक भगवान टावरे आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सध्या घटनास्थळी एनडीआरएफ (NDRF) ची टीम, भिवंडी फायर ब्रिगेड, श्वानपथक, २ रुग्णवाहिका आणि जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई







