जिकडे तिकडे, चोहीकडे… अस्वच्छता सगळीकडे! ​केशवनगर (चिंचवड) मधील नागरिक कचरा अन् दुर्गंधीने त्रस्त; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष


​जिकडे तिकडे, चोहीकडे… अस्वच्छता सगळीकडे!

​केशवनगर (चिंचवड) मधील नागरिक कचरा अन् दुर्गंधीने त्रस्त; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
​चिंचवड (विशेष प्रतिनिधी):
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८, केशवनगर मधील अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून कचरा, मातीचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदारांना वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
​परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या कापलेल्या फांद्या महिनाभरापासून भर रस्त्यात व फूटपाथवर पडून आहेत. साचलेला कचरा सडून प्रचंड दुर्गंधी पसरली असून, पालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “अधिकारी कार्यालय सोडायला तयार नाहीत. त्यांनी स्वतः प्रभागात फिरून परिस्थितीची पाहणी करावी, म्हणजे अस्वच्छतेचे भीषण वास्तव लक्षात येईल,” अशी मागणी नागरिक करत आहेत.
​काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुरात परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये चिखल आणि घाण पाणी शिरले होते. मात्र, पालिका प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनी स्वतःहून सोसायट्यांची स्वच्छता करून घेतली. प्रशासनावर कोणताही अतिरिक्त भार न टाकता नागरिकांनी सहकार्य केले; तरीही पालिकेकडून मात्र नियमित स्वच्छतेबाबत अत्यंत निष्काळजीपणा दाखवला जात आहे.
​या समस्येबाबत भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली आहे. परंतु, अद्याप तरी प्रशासनाला जाग आलेली नाही. आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या समस्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन प्रभागात कायमस्वरूपी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
​नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया:
​पावसाळी चेंबरची माती रस्त्यावरच:
​”गेल्या एका महिन्यापासून चार ते पाच ठिकाणी पावसाळी चेंबरमधील माती काढून रस्त्यावर ढीग लावून ठेवले आहेत. त्यातील अर्धी माती पाण्यात वाहून गेली, तर उरलेली तशीच दुर्गंधीयुक्त होऊन पडून आहे. यामुळे पाणी तुंबून दुर्गंधी निर्माण झाली आहे.”
— संतोष फडके (स्थानिक नागरिक)
​फांद्यांमुळे किड्यांचा प्रादुर्भाव:
​”आमच्या सोसायटीसमोर आणि परिसरात अनेक दिवसांपासून झाडांच्या कापलेल्या फांद्या फूटपाथवर पडून आहेत. तक्रारी करूनही त्या उचलल्या गेल्या नाहीत. आता त्यात किडे तयार होऊन आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.”
— राजू कोरे (नागरिक, केशवनगर)

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!