अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; प्राचार्यांकडून तिसरीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, गुन्हा दाखल
अहिल्यानगर : शहरातील एका खासगी शाळेत तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या प्राचार्यांनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध बालन्याय (Juvenile Justice) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्यांनी विद्यार्थ्याचा गळा दाबून त्याला सुमारे २० सेकंद हवेत उचलून धरल्याचा आरोप आहे. तसेच मुलाच्या हाताला चावा घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बालक घाबरून गेला असून त्याच्या हातावर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.
पीडित विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








