कफ परेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पतीचा गळफास, पत्नी व दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : कफ परेड येथील नेव्ही नगर परिसरात एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना १५ ऑगस्ट २०२६ रोजी समोर आली. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूरणमल शंभूलाल मेहरा (वय ३०) हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांची पत्नी ओमा पूरणमल मेहरा (वय २८), मुलगा यश पूरणमल मेहरा (वय ३) आणि दोन महिन्यांचे बाळ हे बेडवर मृतावस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही मृतदेह कफ परेड पोलिसांच्या मोबाइल-१ वाहनातून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला असून पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत पूरणमल मेहरा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. तसेच पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूबाबत विषबाधेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमागील कारण काय आहे, याचा कफ परेड पोलीस तपास करत असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया





