कोट्यवधींचा नवीन डांबरी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला; जळगाव मनपाचे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, उडवाउडवीची उत्तरे!


कोट्यवधींचा नवीन डांबरी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला; जळगाव मनपाचे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, उडवाउडवीची उत्तरे!

सोमेश मुळे जळगाव:
शहरातील पांडे चौक ते इच्छादेवी चौक या दरम्यान नुकताच करण्यात आलेला नवीन डांबरी रस्ता पहिल्याच काही दिवसांच्या पावसात पूर्णपणे उखडला आहे. या मुख्य रस्त्यावर आता मोठमोठे आणि धोकादायक खड्डे पडले असून, हा रस्ता वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचा पैसा पाण्यात गेला असतानाच, जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाकडून मात्र यावर अत्यंत बेजबाबदार आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पांडे चौक ते इच्छादेवी चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता आहे. नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच येथे नवीन डांबरीकरण केले होते. मात्र, या कामात वापरलेले साहित्य आणि डांबराचा दर्जा इतका निकृष्ट होता की, पहिल्याच मुसळधार पावसात डांबराचे थर निघून गेले. सध्या या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका तयार झाली असून, दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी एकत्र येत जळगाव शहर महानगरपालिकेला अधिकृत निवेदन दिले होते. रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही मनपा प्रशासनाने यावर कोणतीही डागडुजी किंवा उपाययोजना केलेली नाही.
हक्काचा प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा स्थानिक नागरिक मनपा कार्यालयात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे जातात, तेव्हा त्यांना “निधी नाही”, “पाऊस थांबू द्या” किंवा “ते काम आमच्या विभागाचे नाही” अशी उडवाउडवीची आणि अरेरावीची उत्तरे दिली जात आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जनतेच्या समस्यांबाबत इतके उदासीन कसे असू शकतात? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नवीन रस्ता महिनाभरातच खराब होतो, याचा सरळ अर्थ कंत्राटदाराने कामात मोठा भ्रष्टाचार केला आहे. तरीही महानगरपालिका त्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई का करत नाही? रस्ता पुन्हा दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी कोणाची? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मनपा प्रशासन दोषी कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

“आम्ही नियमित कर भरतो, मग आम्हाला हे असे खड्डेयुक्त रस्ते आणि अधिकाऱ्यांची उडवाउडवी का सहन करावी लागत आहे?” असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी केला आहे.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!