*रोजगार हेच एकल महिलांचे पुनर्वसन* : हेरंब कुलकर्णी श्रीरामपुरमध्ये एकल महिला रोजगार प्रेरणा कार्यशाळा .

टाकळीभान प्रतिनिधी) – रोजगार हेच एकल महिलांचे खरे पुनर्वसन असल्याने एकल महिलांनी दुःख विसरून स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्याला नवीन अर्थ द्यावा. त्यासाठी महाराष्ट्र शासन, उमेद अभियान व साऊ एकल महिला समिती तुमच्या पाठीशी आहे.. त्यासाठीच ही कार्यशाळा आहे.. तेव्हा स्वयंरोजगार सुरू करण्याचा संकल्प करावा असे आवाहन
साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक व महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या एकल महिला धोरण मसुदा समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी श्रीरामपूर येथे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. त्यास गती देण्यासाठी
साऊ एकल महिला समिती, श्रीरामपूर पंचायत समिती, उमेद अभियान व मिशन वात्सल्य शासकीय समिती यांच्या वतीने श्रीरामपूर येथील तहसील कार्यालय सभागृहात आयोजित एकल महिला रोजगार प्रेरणा कार्यशाळेत अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता निकाळजे , श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद नवले, उपनगराध्यक्षा कांचन सानप, नगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मंजुषा मुरकुटे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक रवींद्र काळे, अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे विभागप्रमुख दिवाकर भोयर, भाजप गटनेत्या वैशाली चव्हाण, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या शहर व्यवस्थापक रेखा चाटे, स्वाती निरगुडे, समुदाय संघटक हरिष पैठणे, भाजप महिला मोर्चाच्या पूजा चव्हाण, नगरसेविका वैशाली पोटे, अनिता आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी प्रास्ताविक केले. एकल महिलांना संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनांचा काही प्रमाणात आधार आहे. पण त्यावर अवलंबून न राहता त्यांनी स्वयंरोजगार सुरू करून स्वावलंबी बनावे, यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन साऊ एकल समितीच्या पुढाकाराने होत असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला व बाल विकास विभागांतर्गत राखीव असलेल्या पाच ते दहा टक्के निधी पैकी काही निधी एकल महिलांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे वतीने श्री साळवे यांनी मांडली.
तालुका समन्वयक बाळासाहेब जपे, दिलीप लोखंडे, श्रीकृष्ण बडाख, “उमेद”चे तालुका व्यवस्थापक किरण शेरे, चंद्रलेखा गायकवाड यांनी अतिथींचे स्वागत केले.
याप्रसंगी कुलकर्णी म्हणाले, “एकल महिलांना जीवन प्रवासात साथ देण्यासाठी, तिला प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी तिच्यामागे कोणाचा आधार नसतो. भांडवल कसे उभे करायचे?, कर्ज कसे, कुठून मिळवायचे?कोणते उत्पादन तयार करायचे? त्याची विक्री कुठे, कशी करायची? हे सांगायला तिला कोणी नाही. यासाठी साऊ एकल महिला समितीच्या पाठपुराव्यातून “उमेद अभियान” च्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात एकल महिला रोजगार प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.”
एकल महिला एकटया नसून शासन, प्रशासन त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही गटविकास अधिकारी स्मिता निकाळजे यांनी दिली.
जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक रवींद्र काळे यांनी बॅंकांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध रोजगारविषयक अर्थसहाय्य योजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी उकिरडे यांनी पालिकेच्या एकल महिला सर्वेक्षणाची माहिती दिली. महिला व बालविकास विभागाच्या तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे यांनी कौटुंबिक हिंसाचारार कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
“अंगी कला असेल तर ते जीवन जगण्याचे साधन बनू शकते.याच कलेचा प्रशिक्षण देऊन, विकास करून जीवन जगण्याचे साधन निर्माण करण्याचे कार्य प्रथम संस्था करीत असल्याचे” संस्थेचे विभाग प्रमुख दिवाकर भोयर यांनी सांगितले.
रेखा चाटे व स्वाती निरगुडे यांनी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या योजना व शहरी बचत गटांबाबत मार्गदर्शन केले. शेरे यांनी उमेद अभियानची माहिती दिली. मुकुंद टंकसाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाग समन्वयक लक्ष्मण डांगे यांनी आभार मानले.
———————————–
*पालिका निधी राखून ठेवणार*
महिला व बालकांसाठी राखीव असलेल्या निधीतून काही हिस्सा एकल महिलांसाठी राखून ठेवणार असल्याचे श्रीरामपूर नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मंजुषा मुरकुटे यांनी यावेळी जाहीर करीत मिलिंदकुमार साळवे यांच्या कार्याचे कौतुक केले.
*दलालमुक्त कारभार*
संजय गांधी निराधार योजना विभाग पूर्णपणे दलालमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. याबाबत अडचणी आल्यास एकल महिलांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष शरद नवले यांनी केले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर






