६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी
मुंबई:
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चित्रपटसृष्टीतील दिग्गज मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नामवंत कलावंतांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त मान्यवर:
पं. हृदयनाथ मंगेशकर: चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (२०२५)
सलीम खान (त्यांच्यावतीने पत्नी हेलन खान): स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार (२०२५)
राणी मुखर्जी: स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार (२०२५)
प्रसाद ओक: चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (२०२५)
चित्रपटसृष्टीतील या दिग्गजांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. सलीम खान यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी हा सन्मान स्वीकारला.
या शानदार सोहळ्याला विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रसिद्ध दिग्दर्शक किरण शांताराम यांच्यासह चित्रपट, कला आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगतीमध्ये या सर्व कलावंतांचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.






