क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जालना जिल्हा कार्यकारणी जाहीर
आप्पासाहेब कदम यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, विष्णू शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी तर महेंद्र बेराड यांची भोकरदन तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
पारध, ता. भोकरदन प्रतिनिधी : महेंद्र बेराड
क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जालना जिल्ह्यातील नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. रविकांतजी तुपकर साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री. राजीवजी कसबे साहेब, प्रदेश समन्वयक मा. सचिनजी पांडुळे साहेब तसेच प्रदेश कार्याध्यक्ष श्री. सुरेशजी गवळी साहेब यांच्या सर्वानुमते ही नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये डॉ. आप्पासाहेब ओंकारराव कदम यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर श्री. विष्णू रंगनाथ शिंदे यांची जालना जिल्हाध्यक्ष/जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पारध येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार महेंद्र बेराड यांची भोकरदन तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. आप्पासाहेब कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका व जिल्हा कृषी कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, वनविभाग, आदिवासी विकास विभाग, दुय्यम निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, विविध सहकारी व सरकारी बँका तसेच महावितरण यांसह विविध शासकीय कार्यालयांच्या स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला आहे.
शेतकऱ्यांना न्याय, सन्मान आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक व्यापक पद्धतीने काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटनेची चळवळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
नवनियुक्त डॉ. आप्पासाहेब कदम, जिल्हाध्यक्ष विष्णू शिंदे आणि भोकरदन तालुकाप्रमुख महेंद्र बेराड यांनी संघटनेने सोपविलेल्या जबाबदारीचा उपयोग शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष, संघटन आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून ‘बळीचे राज्य’ आणण्यासाठी संघटनेच्या प्रत्येक क्रांतिकारी कार्यात व चळवळीत प्राणपणाने सहभागी होण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जालना जिल्ह्यात संघटनेची ताकद वाढवून शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी आगामी काळात तालुका व गावपातळीवर संघटनात्मक बांधणी करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.




