महापालिकेच्या रखवालदार मदतनीस कंत्राटाची संपूर्ण माहिती जाहीर करा
कंत्राटदार, मनुष्यबळ, हजेरी, वेतन, PF-ESIC, पोलीस पडताळणीची माहिती देण्याची सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध मिळकती, शाळा, उद्याने आणि अन्य आस्थापनांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने पुरविण्यात येणाऱ्या रखवालदार मदतनीसांच्या कामकाजात पारदर्शकता राखण्याची मागणी भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित कंत्राटाची संपूर्ण माहिती व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये रखवालदार मदतनीस पुरविण्याचे कंत्राट कोणत्या संस्था किंवा कंत्राटदारांना देण्यात आले आहे, त्यांची नावे, पत्ते, कंत्राटाचा कालावधी, कंत्राटाची रक्कम, निविदा आणि कार्यादेशाची माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच प्रभागनिहाय व ठिकाणनिहाय कंत्राटाची माहिती, प्रत्येक ठिकाणी मंजूर असलेले आणि प्रत्यक्ष कार्यरत असलेले मनुष्यबळ, तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांची अभिलेखीय माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार किती वेतन दिले जाते, वेतन अदा केल्याचे अभिलेख, बँकेमार्फत वेतन वितरणाची नोंद, हजेरीपत्रक, ड्युटी चार्ट आणि उपलब्ध असल्यास बायोमेट्रिक हजेरीची माहितीही मागण्यात आली आहे. मंजूर आणि प्रत्यक्ष उपस्थित मनुष्यबळात तफावत असल्यास त्याचीही नोंद उपलब्ध करून द्यावी, असे काळभोर यांनी म्हटले आहे.
PF व ESIC संदर्भातील चलन, ECR तसेच संबंधित अभिलेखांच्या प्रमाणित प्रती, कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी झाली आहे का, आवश्यक वैद्यकीय तपासणी व मेडिकल सर्टिफिकेट घेण्यात आले आहेत का, याची माहिती देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित कंत्राटदारांकडून कार्यादेशातील सर्व अटी व शर्तींचे पालन होत आहे का, याची प्रशासनाने तपासणी केली आहे का, तसेच तपासणी अहवाल उपलब्ध असल्यास त्याच्या प्रमाणित प्रती देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कंत्राटी कामकाजात पारदर्शकता राहणे आवश्यक असून, कागदोपत्री मंजूर मनुष्यबळ आणि प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळामध्ये तफावत असल्यास त्याची चौकशी करावी. तसेच नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधितांवर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ




