ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी : ॲड. एफ. एच. सिरसाट


ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी : ॲड. एफ. एच. सिरसाट

ओबीसींसाठी स्वतंत्र राखीव मतदारसंघ जाहीर करण्याचीही शासनाकडे मागणी; भोकरदन येथे ओबीसी समाजाची चिंतन बैठक उत्साहात संपन्न

भोकरदन : प्रतिनिधी / महेंद्र बेराड

ओबीसी समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर सखोल विचारमंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ओबीसी समाजाची चिंतन बैठक रविवारी (दि. ४) भोकरदन येथील श्रमिक बांधकाम कामगार ऑफिस, पिसे कॉम्प्लेक्स बस स्टॅन्ड समोर येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीत ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यात आली असून, समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच ओबीसी समाजासाठी स्वतंत्र राखीव मतदारसंघ जाहीर करावेत, अशी आग्रही मागणी बैठकीचे आयोजक तथा अध्यक्ष ॲड. एफ. एच. सिरसाट यांनी शासनाकडे केली.

ओबीसी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, हक्क आणि भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, आरक्षण, सामाजिक हक्क, राजकीय प्रतिनिधित्व तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याबाबत विचारमंथन झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. एफ. एच. सिरसाट यांनी ओबीसी समाजाची वस्तुनिष्ठ सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती समोर येण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ओबीसी समाजाची लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्वाची अचूक आकडेवारी उपलब्ध झाल्यास समाजाच्या विकासासाठी धोरणे आखणे अधिक प्रभावी ठरेल. त्यामुळे शासनाने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या अनुषंगाने ओबीसी समाजासाठी राखीव मतदारसंघ निश्चित करून ते शासनाने जाहीर करावेत, अशीही मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजाला लोकशाही व्यवस्थेत योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असून, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बैठकीस समता परिषद, जाफराबादचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर जाधव, माळी महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष गणेश हरकळ, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत अभिजीत भारती, महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष महादूजी सुरडकर, परिट धोबी सेवा मंडळाचे भोकरदन तालुका कार्यकारी अध्यक्ष धोंडीराम पैठणकर, ओबीसी हक्क परिषदेचे भोकरदन तालुका संघटक विश्वनाथराव वरपे यांच्यासह विविध समाजघटकांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीस क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भोकरदन तालुकाध्यक्ष तथा अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष महेंद्र बेराड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओबीसी समाजातील विविध घटकांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.

ओबीसी समाजातील युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर ठोस उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता शासनाकडे ठोस मागण्या मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढवून आगामी काळात ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीचे आयोजन समस्त ओबीसी समाज, मौजे भोकरदन–जाफराबाद, जिल्हा जालना यांच्या वतीने करण्यात आले होते.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!