भोसरी प्रभाग ५ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप


भोसरी प्रभाग ५ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य
प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप
भोसरी : भोसरी आळंदी रोडवरील हनुमान कॉलनी परिसरात कचऱ्याचे ढीग साचत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधील गुळवे मैदान परिसरात दररोज कचरा टाकला जात असून त्याचा ढीग वाढत चालला आहे. या कचऱ्यावर गुरे फिरत असल्याने कचरा सर्वत्र पसरत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिकांना ये-जा करताना नाकावर रुमाल लावून जावे लागत आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा संकलनाची घंटागाडी वेळेवर येत नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यानंतर कधीतरी कचरा उचलला जातो; मात्र त्यानंतर पुन्हा संध्याकाळी त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे केवळ कचरा उचलण्याऐवजी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रभागातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार समस्या मांडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “आम्ही याच प्रभागातून मतदान केले आहे, तरी आमच्या परिसराकडे दुर्लक्ष का केले जात आहे?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका प्रशासनाने गुळवे मैदान परिसराची तातडीने स्वच्छता करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी तसेच परिसरात ‘स्वच्छ परिसर अभियान’ राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!