पुण्यात कॉम्प्युटरअभावी महाज्योतीची परीक्षा रद्द; विद्यार्थिनींचा केंद्राबाहेर संताप
पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राइट स्कूल या परीक्षा केंद्रावर आवश्यक संगणक उपलब्ध नसल्याने महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा रद्द करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत परीक्षा होणार असल्याने विद्यार्थिनी मोठ्या अपेक्षेने केंद्रावर दाखल झाल्या होत्या. मात्र, परीक्षा केंद्रावर आवश्यक संगणक व्यवस्था उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थिनींना परीक्षा न देता ताटकळत राहावे लागले.
परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना बराच वेळ केंद्राबाहेर प्रतीक्षा करावी लागली. यावेळी अन्न-पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रारही विद्यार्थिनींकडून करण्यात आली. परीक्षा कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
अखेर प्रशासनाकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट पसरली. परीक्षेचे नियोजन करताना केंद्रावरील संगणकांसह आवश्यक तांत्रिक सुविधा तपासल्या का नाहीत?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत आमदार रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी परीक्षा पुन्हा कधी आणि कोणत्या पद्धतीने घेतली जाणार, याबाबत महाज्योती प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





