‘पार्टिसिपेट मुंबई’च्या माध्यमातून CSR भागीदारीला नवी दिशा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पार्टिसिपेट मुंबई’ या नव्या डिजिटल उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. सरकार, महापालिका, कॉर्पोरेट क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना एकत्र आणून मुंबईच्या विकासाला गती देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, पर्यावरण, उद्याने, सौंदर्यीकरण आणि गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांतील प्रकल्पांसाठी CSR भागीदारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंपन्या आणि सामाजिक संस्थांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांची निवड करता येणार असून, स्वतःचे प्रकल्पही या मंचावर मांडता येणार आहेत.
“CSRमध्ये किती पैसा खर्च झाला यापेक्षा त्यातून किती लोककल्याण झाले आणि कोणता परिणाम साधला हे महत्त्वाचे आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमधील बालकांमधील कुपोषणावरही CSRच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिका प्रशासन अधिक गतिमान आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी ‘समग्र’ संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच बांधकाम परवानगी प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवून मानवी हस्तक्षेप कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





