थकित कर्ज वसुली कार्यशाळा उप राजधानी नागपुरात संपन्न, श्रीरामपुरचे अॕड. सोपानराव पठारे यांचे मार्गदर्शन..


थकित कर्ज वसुली कार्यशाळा उप राजधानी नागपुरात संपन्न, श्रीरामपुरचे अॕड. सोपानराव पठारे यांचे मार्गदर्शन.

टाकळीभान प्रतिनिधी – थकीत कर्ज वसुलीच्या तांत्रिक पैलूंवर व कर्ज फाईल ते कर्ज वसुली साठी राज्याची उप राजधानी आसलेल्या नागपुरात एकदिवसीय प्रॅक्टिकल सह प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर तरतुदी आणि एनपीए व्यवस्थापनावर या शिबिरात सखोल मार्गदर्शन करण्याची संधी श्रीरामपुर न्यायालयात कार्यरत आसलेले अॕड. सोपानराव पठारे यांना ही संधी मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. या मार्गदर्शन शिबिरात १०४ प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

नुकतेच १० ऑक्टोबर रोजी नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ यांच्या वतीने ‘थकीत कर्ज वसुलीचे तांत्रिक पैलू’ या विषयावर नागपुरातील ‘राजकमल’ येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा उत्साहपूर्ण आणि ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाली. नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतील एकूण १०४ प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था तसेच पगारदार कर्मचारी पतसंस्थांमधील अध्यक्ष, संचालक, अधिकारी, व्यवस्थापक आणि वसुली कर्मचाऱ्यांना थकीत कर्ज वसुलीच्या कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान मिळावे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

कार्यशाळेत दिवाणी व फौजदारी प्रकरणे दाखल करण्याची प्रक्रिया, न्यायालयीन प्रकरणांचे प्रभावी संचालन, कर्ज वसुलीची कायदेशीर कार्यपद्धती, वसुली अधिकाऱ्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या तसेच वसुली प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयांमधील संबंधित कायदेशीर तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वांची माहिती पॉवरपॉइंट सादरीकरण करण्यात आले. सहकार क्षेत्रातील प्रशासकीय व व्यवस्थापकीय कामकाजाचा अनुभव असलेले तसेच व्यवसायाने अधिवक्ता असलेले देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील व श्रीरामपूर राहुरी कोपरगाव नाशिक औरंगाबाद इ. न्यायालयात प्राख्यात वकिल म्हणुन कामकाज करणारे अॕड सोपान पठारे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी थकीत कर्ज वसुलीतील तांत्रिक बाबी, कायदेशीर प्रक्रियेचे विविध टप्पे, न्यायालयीन दाव्यांचे प्रभावी व्यवस्थापन आणि वसुली अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामकाजात घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर विवेचन केले. कायदेशीर तरतुदींचा योग्य वापर करून कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक सक्षम व परिणामकारक कशी करता येईल, याविषयी त्यांनी व्यावहारिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे उद्घाटन नागपूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पंकज वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेचे माजी प्राचार्य जगदीश किल्लोळ, सहकारी पतसंस्था नियामक मंडळाचे सदस्य सीए श्रीकांत दुबे, नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, आणि फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास लेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. फेडरेशनचे विशेष कर्ज वसुली व विक्री अधिकारी दिनेश कडू, श्रीमती वैशाली डहाके, विक्रम कडू, श्रीमती अंजली पवार, मनीष बघेले, संघाचे व्यवस्थापक नीलेश रेवस्कर, सरस्वती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे लक्ष्मण मदनकर तसेच फेडरेशनचे संचालक देवानंद वंजारी व नरसिंग धनविजय यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नागपूर विभागातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांतील पतसंस्था प्रतिनिधी तसेच नागपूर जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापक, संचालक आणि अध्यक्ष अशा एकूण १०४ प्रतिनिधींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!