स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण सहाय्य योजनेतून ११२ विद्यार्थ्यांना चार लाखांचे अर्थसहाय्य
आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये; मंडळाचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी-चिंचवड : “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये समाज लागतो आणि त्या समाज्याचे आपण देणे लागतो,” या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण सहाय्य योजना २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पाचव्या वर्षातील निधी वितरण कार्यक्रमात सहा शाळांमधील ११० विद्यार्थी आणि दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळून एकूण ११२ विद्यार्थ्यांना चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कॅप्टन कदम सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या सामाजिक बांधिलकीतून मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणाऱ्या या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. मंडळाच्या महिला विभागाच्या कार्यकारिणी सदस्य डॉ. संगीता रानडे यांनी प्रास्ताविक केले, तर मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. अजित जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते IICMR, निगडीचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय शुल्काअभावी शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने राबविण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत त्यांनी मंडळाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या आर्थिक मदतीचा योग्य उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून आपले नाव उज्ज्वल करावे. यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता, भविष्यातील संधी आणि स्वतःमधील कमकुवत बाजू यांचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. बदलत्या काळातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावे आणि यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा सल्लाही डॉ. कुलकर्णी यांनी दिला.
जपानमधील कार्यसंस्कृतीचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरणा
कोणतेही काम हलके नसते आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे व प्रभावी पद्धतीने करणे महत्त्वाचे असते, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी जपानमधील रेल्वे स्वच्छतेच्या कामाचे व्यवस्थापन दर्शविणारी एक छोटी चित्रफीत दाखविली. या चित्रफितीच्या माध्यमातून जपानमध्ये रेल्वे स्वच्छतेसारखे कामही किती सुंदर नियोजनाने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रामाणिकपणे केले जाते, हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चित्रफितीवर आधारित काही प्रश्न विचारून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. समर्पक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती निष्ठा यांचे महत्त्व समजले.
स्वतःच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी पुस्तके विकत न घेता ग्रंथालयातील पुस्तकांचा आधार घेतला आणि चांगले यश संपादन केले. त्यामुळे आर्थिक साधने मर्यादित असली, तरी योग्य नियोजन, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविता येते, हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
समाजाचे देणे फेडण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
आज स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही भविष्यात सक्षम झाल्यानंतर पैशांअभावी कोणाचे शिक्षण थांबू नये, यासाठी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे दायित्व स्वीकारावे, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले. समाजाकडून मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून भविष्यात समाजासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य ओळखून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची भावना प्रत्येकाने जोपासावी. आज आपण एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदत केली, तर उद्या तोच विद्यार्थी दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकेल. अशा प्रकारे मदतीची ही साखळी अखंड सुरू राहावी आणि ‘ज्योतीने ज्योत पेटवत राहूया’, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत निधी वितरण
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. अभय कुलकर्णी यांचे स्वागत मंडळाच्या सचिव ॲड. हर्षदा पोरे आणि कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी केले.
निधी वितरण कार्यक्रमाचे संचलन तसेच या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे आभार प्रदर्शन विकास देशपांडे यांनी केले. शिक्षण सहाय्य योजनेचा उपक्रम यापुढेही सुरू राहण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, कार्यकारिणी सदस्य शैलेश भिडे, विनायक पोळ आणि प्रशांत पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी मंडळाच्या ग्रंथपाल नीता जाधव यांनी सर्व शालेय शिक्षकांशी योग्य समन्वय साधला. तसेच सुजीत गोरे, स्नेहल पानसे, कमल खांबे, अनघा देशपांडे आणि वैशाली आम्ले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या सामाजिक बांधिलकीतून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणासाठी मदतीचा हात देतानाच भविष्यात समाजाप्रती योगदान देणारी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






