कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीसाठी टाकळीभानच्या शिवम पटारे याची भारतीय संघात निवड.

टाकळीभान प्रतिनिधी : कबड्डी खेळाचे माहेरघर असलेल्या टाकळीभानचा भूमिपुत्र प्रो कबड्डी स्टार खेळाडू शिवम अनिल पटारे याची कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघात नुकतीच निवड करण्यात आली आहे. अहमदाबाद येथे दि.२१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या कॉमनवेल्थ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी वरिष्ठ पुरुष खेळाडूंची नुकतीच अंतिम यादी जाहीर करण्यात आली, यामध्ये टाकळीभानचा प्रो स्टार कबड्डी खेळाडू शिवम अनिल पटारे याची ही निवड झाल्याने टाकळीभान येथे कबड्डी खेळाडू, क्रीडाप्रेमी ग्रामस्थ यांनी फटाके वाजून जल्लोष व आनंद साजरा केला. टाकळीभान व महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून याच गावचा भूमिपुत्र भारत देशाला आशिया ऑलम्पिक कबड्डी स्पर्धेमध्ये दोन गोल्ड मेडल मिळवून देणारा खेळाडू असलम इनामदार व त्या पाठोपाठ प्रो स्टार कबड्डी खेळाडू शिवम पटारेच्या निवडीने टाकळीभानची मान पुन्हा एकदा कबड्डी क्षेत्रात अभिमानाने उंचावली आहे. व भारतीय कबड्डी संघाला या टाकळीभानच्या मातीने उत्कृष्ट व दर्जेदार कबड्डी खेळाडू दिल्याने येथील ग्रामस्थांमध्ये व कबड्डी क्रीडाप्रेमी मधून आनंदाचे वातावरण आहे. शिवम याच्या निवडीबद्दल गावातील मान्यवर, पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ कबड्डी खेळाडू क्रीडा प्रेमी ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे,श्रीरामपूर






