महावितरणचा भोंगळ कारभार! भोसरी प्रभाग ५ मधील नागरिक तीन महिन्यांपासून त्रस्त


महावितरणचा भोंगळ कारभार! भोसरी प्रभाग ५ मधील नागरिक तीन महिन्यांपासून त्रस्त

वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरूच; नगरसेवकांचेही दुर्लक्ष? इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?

इंटरनेट-वायफाय सेवा ठप्प; नोकरी करणाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम

भोसरी : भोसरी आळंदी रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये महावितरणच्या कुचकामी सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या सुरू असून, यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महावितरण प्रशासनासह प्रभागातील नगरसेवकही या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातील इंटरनेट आणि वायफाय सेवा बंद पडतात. त्यामुळे घरून काम करणारे कर्मचारी, ऑनलाइन काम करणारे व्यावसायिक तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. ऑनलाइन बैठका, कार्यालयीन कामे आणि महत्त्वाची कामे रखडत असल्याने नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार वीज ये-जा होत असल्यामुळे टीव्ही, फ्रिज, संगणक, वायफाय राऊटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नुकसानीची भीतीही नागरिकांना सतावत आहे. अशा प्रकारामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

वीज ग्राहकांकडून नियमितपणे वीजबिल वसूल केले जाते; मात्र सुरळीत वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून समस्या कायम असतानाही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे.

नगरसेवकांनीही लक्ष देण्याची गरज

प्रभागातील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असताना स्थानिक नगरसेवकांनी या प्रश्नात लक्ष घालून महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

महावितरण प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, वारंवार वीजखंडित होण्यामागील कारणे स्पष्ट करावीत आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच स्थानिक नगरसेवकांनीही नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

विजय अडसूळ प्रतिनिधी


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!