विद्याविहार, शीव आणि गोरेगावमधील वाहतूक कोंडी कमी होणार; प्रवासाचा वेळ वाचणार
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑनलाइन पद्धतीने तीन महत्त्वाच्या पुलांचे लोकार्पण केले. यामध्ये विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वेपूल, शीव रेल्वेस्थानकावरील नवीन उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतच्या उड्डाणपुलाचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी करण्यात येत आहे. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.
विद्याविहारमधील प्रवास ३० मिनिटांवरून १० मिनिटांत
विद्याविहार रेल्वेस्थानकावरील नवीन पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या पुलामुळे पूर्व-पश्चिम प्रवासासाठी लागणारा वेळ सुमारे ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या पुलाची एकूण लांबी ६०० मीटर असून, रुंदी १५.५० ते १७.५० मीटर आहे.
शीवचा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला
शीव रेल्वेस्थानकावरील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. नवीन पुलामुळे शीव पूर्व आणि पश्चिम भागांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी परिसराशी जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
या पुलाची लांबी ५४.५ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. रेल्वे भागासाठी ३३.५१ कोटी रुपये, तर पोहोच रस्त्यासाठी ३१.६२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुलामुळे मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामालाही मदत होणार असून, भविष्यात लोकल गाड्यांची संख्या आणि वारंवारता वाढविण्याचा मार्ग मोकळा होईल.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला गती
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथे १.२६ किलोमीटर लांबीचा सहा मार्गिकांचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. रत्नागिरी हॉटेल जंक्शन, ए.के. वैद्य मार्ग आणि फिल्म सिटी रोड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होईल. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था विकसित केली जात आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






