रेल्वे मालवाहतूक आणि विकासासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक
रामेश्वर सेलूकर यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन; मराठवाड्यातील रेल्वे विस्तारावर भर
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बिझनेस डेव्हलपमेंट मीटिंग २१ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. सीनियर डीसीएम श्री. दिलीपकुमार दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला डीआरयूसीसी (DRUCC) सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रामेश्वर सेलूकर यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.
बैठकीत रेल्वे मालवाहतूक वाढविणे, व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविणे आणि मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती देण्याबाबत चर्चा झाली. यावेळी रामेश्वर सेलूकर यांनी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
नवीन मालवाहतूक मार्गिका : छत्रपती संभाजीनगर ते बिडकीन तसेच छत्रपती संभाजीनगर ते शेंद्रा किंवा करमाड ते शेंद्रा दरम्यान स्वतंत्र गुड्स रेल्वे मार्गिका उभारावी.
रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भिंतीचित्रांच्या माध्यमातून दर्शवावा. प्रत्येक स्थानकावर संबंधित शहराचा इतिहास, संस्कृती आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करावे.
मराठवाड्यात रेल्वे विस्तार : मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा रेल्वे नेटवर्कने जोडावा.
अंबाजोगाईला रेल्वे जोडणी : अंबाजोगाई शहराला घाटनांदूर, परळी आणि बीडशी रेल्वेने जोडण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.
RO-RO सेवा : छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून चालकासह ट्रक रेल्वेगाडीतून वाहून नेण्याची सुविधा सुरू करावी.
बैठकीत व्यापाऱ्यांनी मालवाहतुकीतील अडचणी मांडून रेल्वे प्रशासनाला विविध सूचना केल्या. सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करताना सीनियर डीसीएम श्री. दिलीपकुमार दास यांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून पुढील मंजुरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.
या मागण्यांमुळे मराठवाड्यातील रेल्वे संपर्कव्यवस्था, औद्योगिक विकास आणि व्यापारी मालवाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






