महाराष्ट्राचे रसायन उद्योगासाठी स्वतंत्र धोरण लवकरच! पालघरमध्ये ५,००० एकरांपर्यंत रसायन पार्क उभारण्याचा मानस; रोजगार दुप्पट, गुंतवणूक तिप्पट करण्याचे उद्दिष्ट


महाराष्ट्राचे रसायन उद्योगासाठी स्वतंत्र धोरण लवकरच!
पालघरमध्ये ५,००० एकरांपर्यंत रसायन पार्क उभारण्याचा मानस; रोजगार दुप्पट, गुंतवणूक तिप्पट करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : महाराष्ट्रातील रसायन उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र धोरण तयार करत असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच वाढवण बंदर परिसरातील पालघर येथे २,५०० ते ५,००० एकर जमिनीवर भव्य रसायन पार्क उभारण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘India Chem 2026’ चे उद्घाटन झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे ३,६०० रसायन उद्योग कार्यरत असून, देशाच्या रसायन क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात राज्याचा १९ टक्के, तर निर्यातीत १७ टक्के वाटा आहे. राज्यातील या उद्योगातून सुमारे तीन लाख रोजगार निर्माण झाले आहेत. योग्य धोरणांच्या माध्यमातून रोजगार दुप्पट आणि गुंतवणूक तिप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्यात बल्क ड्रग पार्क उभारून औषधनिर्मिती क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तळोजा, नवी मुंबई, तारापूर, पालघर, पाताळगंगा, रोहा, लोटे परशुराम, कुरकुंभ आणि बुटीबोरी येथे रसायन उद्योग विकसित झाले आहेत. तसेच कोल गॅसिफिकेशनचे पाच प्रकल्प प्रगत टप्प्यात आहेत.
‘मैत्री’ एकल खिडकी प्रणाली आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आवश्यक परवानग्या व सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात रसायन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, एचएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास आणि यूपीएलचे अध्यक्ष व समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!