आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही! देशातील ७ टोल प्लाझांवर MLFF प्रणाली सुरू
फास्टॅगनंतर टोल वसुलीसाठी नवे तंत्रज्ञान; नंबर प्लेट ओळखून आपोआप वसूल होणार टोल
नवी दिल्ली : देशातील महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने टोल वसुली व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. फास्टॅगनंतर आता ‘मल्टी लेन फ्री फ्लो’ (MLFF) ही अत्याधुनिक टोल प्रणाली देशातील सात टोल प्लाझांवर प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रणालीमध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सर्सच्या माध्यमातून वाहनांची नंबर प्लेट ओळखली जाणार आहे. त्यानंतर संबंधित वाहनाच्या टोलची रक्कम स्वयंचलित पद्धतीने वसूल केली जाईल. त्यामुळे वाहनचालकांना टोल नाक्यावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही.
या नव्या व्यवस्थेमुळे प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच टोल नाक्यांवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. भविष्यात ही प्रणाली देशभर लागू झाल्यास महामार्ग प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी







