महाराष्ट्रात नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी; ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा!
नागपूर आणि नाशिक विभागातील विविध ठिकाणी महसूल कार्यालये सुरू होणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर आणि नाशिक प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी ही कार्यालये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील निर्णयाची घोषणा केली. चिंचोली खापरखेडा, घोट, सिन्नर, शिरपूर, शहादा, जळगाव, चाळीसगाव आणि पहूर या ठिकाणांचा नव्या कार्यालयांच्या यादीत समावेश आहे.
या निर्णयामुळे संबंधित परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या कामांसाठी दूरच्या तहसील कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. जमीनविषयक प्रकरणे, महसूल नोंदी आणि अन्य प्रशासकीय कामे स्थानिक पातळीवर अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी







