लोहार समाजाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार! ना. संजय राठोड

टाकळीभान प्रतिनिधी- :छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड-किल्ल्यांवरील सैन्यासाठी शस्त्रास्त्रे तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम लोहार समाजाने केले. पिढ्यानपिढ्या आपल्या पारंपरिक कौशल्याच्या जोरावर समाजाने बळीराजाची सेवा केली. मात्र, आधुनिक यांत्रिकीकरणामुळे लोहार समाजाचा पारंपरिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला असून, आज समाजासमोर रोजगार, आर्थिक अडचणी आणि शिक्षणाचा अभाव अशा अनेक समस्या उभ्या आहेत. या समाजाला पुन्हा एकदा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे प्रतिपादन भटके-विमुक्त चळवळीचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांनी केले.
अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत लोहार समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी सचिव मुकुंद आडेवार, राहुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपळघट, अहिल्यानगर जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष भास्कर पोपळघट, माजी नगरसेवक संतोष पोपळघट, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजय जगताप, सदस्य बाळासाहेब इघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती पोपळघट, प्रकाश इघे, रावराहेब थोरात, प्रा. संजय विघे, बाळासाहेब पोपळघट, जयकुमार हरेल, ज्ञानेश्वर गायकवाड, सुखदेव गायकवाड, राजेंद्र भालेराव, दत्तात्रय पोपळघट रामदास गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने लोहार समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले की, लोहार समाजाने पिढ्यानपिढ्या आपल्या पारंपरिक व्यवसायातून समाजाची आणि शेतकऱ्यांची सेवा केली आहे. मात्र, बदलत्या काळानुसार पारंपरिक व्यवसायासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण लोहार समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटित होऊन एकत्र आला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मी राज्याचा मंत्री असलो तरी तुमच्यातीलच एक घटक आहे. समाजाच्या विविध मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवून समाजाच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये लोहार समाजातील तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी समाजाच्या सामूहिक सहभागातून नियोजित लोहार समाज औद्योगिक संस्थेला दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर विशेष चर्चा करण्यात आली. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री राठोड यांनी दिले.
याशिवाय राज्यातील भटके-विमुक्त समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. जात प्रमाणपत्र, स्वयंरोजगाराच्या संधी, आर्थिक विकास, आरोग्य आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा लोहार समाज संघटनेच्या वतीने मंत्री संजय राठोड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमध्ये नियोजित लोहार समाज औद्योगिक संस्थेला सामूहिक उद्योग उभारण्यासाठी शासन स्तरावर दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी, लोहार समाज महामंडळाच्या कर्जाची मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करावी, कर्जप्रकरणातील जाचक अटी रद्द कराव्यात, शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, लोहार समाजातील तरुणांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध करून द्यावी तसेच दुष्काळग्रस्त लोहार कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्यांचा समावेश होता.
मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाजबांधवांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट : लोहार समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार – ना. संजय राठोड
यावेळी अहिल्यानगर जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष भास्कर पोपळघट यांनी लवकरच जिल्ह्यात लोहार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या मेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांनी मंत्री संजय राठोड यांना केली.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर






