मानखुर्द फ्लायओव्हर दुर्घटना: ड्रिलिंग मशीन कोसळून पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू.


मानखुर्द फ्लायओव्हर दुर्घटना: ड्रिलिंग मशीन कोसळून पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू.

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरात एमएमआरडीएच्या फ्लायओव्हर बांधकामस्थळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत नेहरू नगर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संतोष गोपाल चव्हाण (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिलच्या रात्री संतोष चव्हाण हे सायन-पनवेल महामार्गावरून मोटरसायकलने चेंबूर येथील आपल्या घरी जात होते. यावेळी मानखुर्द येथील फ्लायओव्हर बांधकामस्थळी उभी असलेली विशाल ड्रिलिंग मशीन अचानक कोसळली आणि ती थेट त्यांच्या अंगावर पडली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.
प्राथमिक तपासानुसार, ड्रिलिंग मशीन असमान आणि ढिल्या जमिनीवर उभी केल्यामुळे भूस्खलन होऊन ती उलटल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय असून मानखुर्द पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष चव्हाण हे पूर्व नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असलेल्या चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व सहकाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेनंतर बांधकामस्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!