अहिल्यानगरमध्ये आणखी एक भोंदू सापडला; भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक.


अहिल्यानगरमध्ये आणखी एक भोंदू सापडला; भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

श्रीरामपूर प्रतिनिधी — टाकळीभान येथे भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक व शारीरिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक मधुकर आढाव याच्याविरोधात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला २०२३ मध्ये वैयक्तिक अडचणींमुळे त्याच्याकडे गेली होती. त्यावेळी “तुला भूतबाधा झाली आहे” अशी भीती दाखवत आरोपीने तिच्याकडून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, २०२५ मध्ये आरोपीने महिलेचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस यांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!