मुलींच्या त्रासावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप! फोनवरून अधिकाऱ्यांना झापताच तासांत कुलरची व्यवस्था
राज्यातील विदर्भ भागातील भीषण उष्णतेमुळे वसतिगृहातील मुलींना सहन करावा लागणारा त्रास समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोनवरून फैलावर घेतले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे रखडलेला प्रश्न काही तासांत मार्गी लागला असून मुलींसाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली.
विदर्भात सध्या तापमानाने ४५ अंशांच्या पुढे झेप घेतल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना असह्य त्रास सहन करावा लागत होता. उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून विद्यार्थिनींकडून कुलरची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीकडे गांभीर्याने न पाहता दिरंगाई केल्याचा आरोप होता.
हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुलींच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मुख्यमंत्री स्तरावरून आदेश मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू करत काही तासांतच कुलरची व्यवस्था पूर्ण केली.
मुख्यमंत्र्यांच्या या तडक निर्णयामुळे वसतिगृहातील मुलींना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले आहे. या घटनेमुळे प्रशासकीय निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सामान्यतः शांत आणि संयमी स्वभावाचे मानले जाणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थिनींच्या अडचणीवर दाखवलेली तत्परता प्रशासनासाठी स्पष्ट संदेश मानला जात आहे—सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर दिरंगाई सहन केली जाणार नाही.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










