शनीदेव अपराध करणाऱ्यास सोडत नसून, भक्ती-पुण्य करणाऱ्यास पावतो – महंत रामगिरी महाराज

शनिदेवगांव येथील शनैश्वर जयंती उत्साहात साजरी
टाकळीभान प्रतिनिधी : नऊ ग्रहांपैकी शनि हा अत्यंत प्रभावशाली ग्रह असून भक्ती आणि पुण्य करणाऱ्यांवर शनिमहाराज कृपा करतात, मात्र अपराध करणाऱ्यांना ते कधीही सोडत नाहीत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. गोदाकाठावरील श्रीक्षेत्र शनिदेवगांव (ता. वैजापूर) येथील शनैश्वर देवस्थानात वैशाख शनि अमावस्या व शनैश्वर जयंतीनिमित्त आयोजित त्रिदिवसीय सोहळ्याच्या सांगता कीर्तनात ते बोलत होते.
श्रीरामपूर-नेवासा, गंगापूर-वैजापूर तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या गोदातीरावरील शनिदेवगांव येथे शनिवारी (दि. १६ मे) पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ६ नंतर भाविकांना बारीतून दर्शन घ्यावे लागले.
गोदातीरावर असलेल्या शनैश्वर मंदिराच्या दक्षिण बाजूस जायकवाडी बॅंकवॉटरचा थंडगार वारा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सायंकाळी ७ वाजता हजारो महिला-पुरुष भाविकांच्या उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनास सुरुवात झाली.
“एवढा प्रभू भावे तेणे संपूष्टी रहावे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना महाराज म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी अभंगवाणीतून परमात्म्याच्या स्वरूपाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. शनिदेवगांव येथील गोदातीरावरील हे शनैश्वर देवस्थान अतिशय पुरातन असून, या देवस्थानामुळेच गावाला ‘शनिदेवगांव’ हे नाव प्राप्त झाले आहे.
समाजामध्ये “शनिदेव कुणालाच सोडत नाहीत” अशी भावना असली तरी ती पूर्णतः योग्य नाही. शनिदेव अपराध करणाऱ्यांवर कठोर असतात आणि त्यांच्यावर अवकृपा करतात; मात्र पुण्य करणाऱ्या भक्तांवर कृपा करून त्यांचा उद्धार करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाही शनैश्वर जयंतीनिमित्त शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, रामेश्वर भक्त मंडळ, गंगागिरी महाराज भक्त मंडळ, जयबाबा भक्त परिवार तसेच विविध तरुण मंडळांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी सर्वांचे कौतुक केले.
या कीर्तन सोहळ्यास संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, वैजापूर नगराध्यक्ष दिनेश परदेशी, धनंजय धोर्डे, हरिशरण महाराज, संदीपान महाराज, योगेंद्रगिरी महाराज, मधु महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, चंद्रकांत महाराज सावंत, दत्तू खपके, विजय पवार, उदयसिंह पवार, मोहन गायकवाड, सरपंच संजय मेघळे, प्रसाद पवार यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
चौकट
गंगागिरी सप्ताहाची ४२ लाखांची शिल्लक रक्कम आळंदी मठ बांधकामासाठी
शनिदेव येथील १७८ व्या गंगागिरी सप्ताहासाठी कोणतेही मोठे राजकीय नेते किंवा साखर कारखानदार पुढे आले नव्हते. पंचक्रोशीतील छोट्या गावांतील कष्टकरी शेतकऱ्यांनी हातभार लावून सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केले, असे सांगत महंत रामगिरी महाराज यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
सप्ताहासाठी भाविकांनी भरघोस देणगी दिल्याने उर्वरित राहिलेली तब्बल ४२ लाख रुपयांची शिल्लक रक्कम श्रीक्षेत्र आळंदी येथील मठाच्या बांधकामासाठी वापरण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.










