नेरूळ येथे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा
नेरूळ, नवी मुंबई : श्री शिव गणेश मंदिर, सारसोळे बस डेपोच्या बाजूला, नेरूळ येथे १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. आयोजक रजनी कलोसे आणि त्यांच्या मैत्रिणींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मंदिराच्या सभामंडपात महिलांनी नाच-गाणी, झिम्मा, फुगडी, फेर यांसह विविध पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण मानला जातो. निसर्ग आणि प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या सणाशी जोडलेली आहे. पूर्वी गावागावांत पारंपरिक खेळ आणि सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात होते. मात्र, मोबाईल, दूरचित्रवाणी, बदलती जीवनशैली आणि मनोरंजनाच्या बदलत्या साधनांमुळे पारंपरिक खेळांची आवड कमी होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये स्नेहभाव वाढविण्यासह सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून नागपंचमीचा उत्सव साजरा करत असल्याचे आयोजक रजनी कलोसे यांनी सांगितले. शिव गणेश मंदिर ट्रस्टकडून धार्मिक कार्यक्रमांसाठी सभामंडप विनामूल्य उपलब्ध करून दिला जात असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
रजनी कलोसे म्हणाल्या, “या दिवशी आम्ही महिला आवडीची पारंपरिक वस्त्रे परिधान करून नटून-थटून एकत्र येतो. नाच-गाणी, झिम्मा, फुगडी अशा पारंपरिक खेळांमधून धकाधकीच्या जीवनात आनंदाचे काही क्षण अनुभवतो.”
यावेळी सहभागी महिलांनी नागदेवतेची पूजा करून सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, अशा शुभेच्छा दिल्या. पारंपरिक धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक मूल्ये आणि सांस्कृतिक परंपरा जपत हा उत्सव उत्साहात पार पडला.
— भालचंद्र माने, नेरूळ, नवी मुंबई






