कायदेशीर पूर्तता होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये; टाकळीभान ग्रामसभेत एकमुखी ठराव
टाकळीभान प्रतिनिधी :येथील बसस्थानक परिसरात शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्यानंतर प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. पुतळ्याच्या परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुतळा हटवू नये, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
यावेळी अनेक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत “वेळ आली तर तुरुंगात जाण्यास तयार आहोत; मात्र पुतळा हटवू देणार नाही,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे संपूर्ण ग्रामसभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरच केंद्रित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या.
शासकीय परिपत्रकानुसार १ मे रोजी होणारी ग्रामसभा मंगळवारी २० मे रोजी ग्रामसचिवालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डौले, कृषी सहाय्यक धुमाळ, तलाठी रुपाली रामटेके, पशुवैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी भिंगारदे यांनी घरकुल योजना, शासकीय जागेवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करणे, मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजना तसेच अन्य शासकीय योजनांची माहिती ग्रामसभेला दिली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत चर्चा रंगली. शिवाजी शिंदे यांनी प्रशासनाने ग्रामस्थांवर दबाव आणू नये, असे सांगत जबरदस्तीने पुतळा हटविण्याचा प्रयत्न झाल्यास ग्रामस्थ तीव्र विरोध करतील, असा इशारा दिला. “परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे. वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी आहे; मात्र पुतळा हटवू देणार नाही,” असे ते म्हणाले.
माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचे संस्कार नव्या पिढीवर होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्रशासनाने पुतळा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे नारायण काळे म्हणाले की, राज्यभर अनेक ठिकाणी छत्रपतींचे पुतळे उभारले गेले आहेत. मग टाकळीभानमधील पुतळ्याबाबतच प्रशासन कठोर भूमिका का घेत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का?” अशी शंका शिवप्रेमींमध्ये निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी उपसरपंच भारत भवार यांनी पुतळा जागेवरच कायम ठेवावा, अशी मागणी केली. अनिल बोडखे यांनी गट क्रमांक २४५, २४६ आणि २४७ मध्ये पुतळ्यासाठी एक गुंठा जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. राहुल पटारे यांनी “पुतळ्याला कोणाचाही विरोध नाही. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल,” असे सांगितले. बापूसाहेब शिंदे यांनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासोबतच छत्रपतींचा पुतळा हलवू नये, अशी मागणी केली.
ग्रामसभेदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याच्या समर्थनार्थ एकमुखी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे ग्रामसभा पूर्णपणे या विषयाभोवतीच फिरताना दिसली. ग्रामसभेचा ठराव प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पुतळा स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली.
या प्रसंगी बंडू बोडखे, यशवंत रणनवरे, सुनील बोडखे, अनिल पटारे, रंजित मगर, बब्लू वाघुळे, अक्षय कोकणे, पवन मगर, संभाजी पटारे, पांडू मगर, ज्ञानेश्वर कोकणे, दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब पटारे, एकनाथ पटारे, जयकर मगर, प्रशांत कोकणे, सूरज कोकणे, बंटी गलांडे, विलास बोडखे, सुरेश पटारे, भाऊसाहेब पवार, सुजित गोंडे, गौरव चितळे, काका कोकणे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सरपंच अर्चना रणनवरे यांनी सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले.
चौकट
कायदा-सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य – स.पो.नि. डौले
ग्रामसभेसाठी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डौले उपस्थित होते. ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने आडमुठी भूमिका घेऊ नये. ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जो ठराव करण्यात येईल, त्याची प्रत प्रशासनाकडे द्यावी. संबंधित ठराव वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठविला जाईल व त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.
पत्रकार दिलीप लोखंडे








