मोशीत उभारला जाणार IIM नागपूरचा नवा कॅम्पस;
पिंपरी-चिंचवडला मिळणार जागतिक दर्जाची शैक्षणिक ओळख
पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक आणि विकासाच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाणार असून, Indian Institute of Management Nagpur (IIM नागपूर) चा नवा कॅम्पस मोशी येथे उभारण्यात येणार आहे. या भव्य प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाची शैक्षणिक ओळख मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भातील प्रस्तावाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देत स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे कॅम्पस उभारणीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन कॅम्पसच्या माध्यमातून व्यवस्थापन आणि व्यावसायिक शिक्षणाची उच्च दर्जाची संधी स्थानिक तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे.
उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Pimpri-Chinchwad आणि मोशी परिसराच्या आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकासाला या प्रकल्पामुळे मोठी गती मिळणार आहे. कॅम्पसच्या उभारणीमुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून, पिंपरी-चिंचवडला देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्रांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








