कांद्याला मिळेना भाव; १२ क्विंटल कांदा विकून शेतकऱ्यालाच खिशातून द्यावे लागले ₹३०१

बीड : प्रतिनिधी – कांद्याच्या दरातील सततच्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील देवळा बुद्रुक येथील शेतकरी गणेश तोडेकर यांनी तब्बल १२ क्विंटल ८७ किलो कांदा विक्रीसाठी Solapur येथील बाजारात आणला होता. मात्र या कांद्याला केवळ ₹१४६८ इतकाच भाव मिळाला.
विशेष म्हणजे कांदा विक्रीसाठी वाहतूक, हमाली आणि तोलाई असा एकूण ₹१७६९ खर्च आला. त्यामुळे कांदा विकून पैसे मिळण्याऐवजी शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातूनच ₹३०१ भरावे लागले. या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असताना मागणी कमी असल्याने दर कोसळले आहेत. उत्पादन खर्च, मजुरी, खतांचे वाढते दर आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. अनेक ठिकाणी कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कांद्याला किमान हमीभाव द्यावा, निर्यात धोरण स्थिर ठेवावे आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे .
पत्रकार: शाम शिरसाठ पुणे.







