मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय हस्तक्षेपामुळे अर्ज नाकारल्याचा विजय पाटकर यांचा खळबळजनक आरोप.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून सध्या चित्रपट सृष्टीत मोठे रणकंदन माजले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आपला उमेदवारी अर्ज रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी केला असून, यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मंत्र्यांच्या दबावामुळे अर्ज बाद?
विजय पाटकर यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला की, एका बड्या मंत्र्यांच्या दबावाखाली निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. केवळ आपलाच नव्हे, तर अभिनेत्री क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचेही अर्ज याच राजकीय हस्तक्षेपामुळे नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मेघराज राजेभोसले यांच्यावर निशाणा
यावेळी पाटकर यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर थेट निशाणा साधला. “राजकारण्यांनी चित्रपट क्षेत्रात हस्तक्षेप करू नये,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. कलाकारांच्या संस्थेत बाह्य शक्तींचा वावर वाढल्याने चित्रपट सृष्टीतून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता या आरोपांवर महामंडळ काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429







