सोलापूरच्या प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या; कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल?

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रिलस्टार तथा ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावरही शोक व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून रोहिणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
रोहिणी पाराध्ये या सोशल मीडियावर त्यांच्या रिल्समुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत्या. ‘हॉटेल ग्रामपंचायत’मुळेही त्यांनी अल्पावधीत वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने चाहत्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आत्महत्येमागील नेमके कारण शोधले जात असून, सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पत्रकार: शाम शिरसाठ पुणे.










