नवी मुंबईत वीज कपातीविरोधात नागरिकांचा संताप; महिला थेट उशी-चादर घेऊन वीज कार्यालयात
नवी मुंबई : प्रचंड उकाडा आणि वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नवी मुंबईतील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. उलवे, कामोठे, घणसोली, ऐरोली आणि कोपरखैरणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर एका संतप्त महिलेने थेट उशी आणि चादर घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना रात्रीच्या वेळी तासन्तास वीज गायब होत असल्याने नागरिकांना झोप घेणेही कठीण झाले आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना याचा मोठा फटका बसत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या एका नोकरदार महिलेने रडत आपली व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर रात्रीही वीज नसल्याने जगायचे कसे, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
वीजपुरवठ्यातील सततच्या व्यत्ययाविरोधात दुसऱ्या एका महिलेने थेट उशी आणि चादर घेऊन कार्यालयात ठाण मांडल्याने परिसरात खळबळ उडाली. रात्रभर वीज नसल्याने घरात राहणे अशक्य झाल्याचा आरोप करत तिने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
दरम्यान, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली आणि गावठाण भागात काही ठिकाणी ८ ते १२ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे व्यापार, उद्योग आणि लघुउद्योजकांचेही मोठे नुकसान होत आहे. विशेषतः थंड पेये, आईस्क्रीम आणि रेफ्रिजरेशनवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांकडून संबंधित प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, नियोजित कामांमुळे वीजपुरवठा खंडित होणार असल्यास पूर्वसूचना देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429








