बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अचानक पाहणी; आरोग्य व्यवस्थेवर नाराजी


बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अचानक पाहणी; आरोग्य व्यवस्थेवर नाराजी

बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रां पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सुविधांची पाहणी केली. या औचक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली असून विविध विभागांची तपासणी करत त्यांनी रुग्णसेवेचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा तसेच प्रशासकीय कामकाजाची त्यांनी सखोल माहिती घेतली. काही ठिकाणी आढळून आलेल्या त्रुटी आणि अस्वच्छतेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

कामकाजात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर अधिक लक्ष ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!