अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची १६.२४ कोटींची फसवणूक; पालिका अधिकाऱ्याचे निलंबन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल १६ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीच्या आमिषाने ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या ‘के-नॉर्थ’ विभागातील सहाय्यक आयुक्तासह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनर्विकास प्रकल्पातून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच आरोपींपैकी काही जण फरार असल्याची माहिती समोर येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत.
फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने आणि प्रकरणाचे स्वरूप गंभीर असल्याने पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या आर्थिक गैरव्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून संबंधित व्यवहारांची कागदपत्रे आणि आर्थिक नोंदी तपासल्या जात आहेत.
या घटनेमुळे पुनर्विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना आवश्यक ती पडताळणी आणि कायदेशीर तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429








