शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली १८ जून रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये जनता मोर्चा
पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध नागरी प्रश्न, शैक्षणिक आरक्षण, खासगीकरण तसेच मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य जनता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा एम्पायर इस्टेट, हनुमान मंदिर, चिंचवड येथून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे जाणार आहे.
शिवसेना शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, युवासैनिक, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मोर्चामध्ये पुनावळे येथील शालेय आरक्षण खासगी संस्थांना देण्यास विरोध, महापालिकेच्या आरक्षित जागांचे खासगीकरण रोखणे, शालेय साहित्य वाटपातील कथित गैरव्यवहारांची चौकशी, पवना नदीची दुरवस्था, ताथवडे परिसरातील कचरा व बांधकामातील राडारोडा प्रश्न, शहरातील नाल्यांची साफसफाई, दापोडी येथे खेळाचे मैदान उभारणे तसेच ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न यांसारख्या विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत.
शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चाला यशस्वी करावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहर प्रमुख चेतन पवार यांनी करण्यात आले आहे.
पत्रकार विजय अडसूळ





