रायपूरजवळ भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना; परिसरात खळबळ.


रायपूरजवळ भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना; परिसरात खळबळ

रायपूर प्रतिनिधी:  छत्तीसगडमधील रायपूरजवळ घडलेल्या एका भीषण आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. वर्चस्वाच्या वादातून भाजप नेते भारत सिंह उर्फ लाला सिंह यांच्यासह तिघांचा जिवंत जाळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोरिया जिल्ह्यातील सोहनत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोगई गावाजवळ भारत सिंह यांच्या फॉर्च्युनर वाहनाचा काही हल्लेखोरांनी पाठलाग केला. त्यानंतर दोन टिपर वाहनांच्या मदतीने त्यांची गाडी अडवण्यात आली. गाडी थांबताच हल्लेखोरांनी वाहनावर पेट्रोल ओतून आग लावली.

या अमानुष हल्ल्यात भारत सिंह यांच्यासह गाडीत असलेल्या आणखी दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्राथमिक तपासात हा संपूर्ण प्रकार वाळू माफिया आणि टिपर चालकांमधील वर्चस्वाच्या वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

चित्रपटातील दृश्यांनाही मागे टाकणाऱ्या या क्रूर हत्याकांडामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!