पुण्यात चाळीस विद्यार्थ्यांची स्कूल बस विहिरीच्या कठड्यावर अडकली; मोठी दुर्घटना टळली


पुण्यात चाळीस विद्यार्थ्यांची स्कूल बस विहिरीच्या कठड्यावर अडकली; मोठी दुर्घटना टळली

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी परिसरात शुक्रवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सुमारे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या विहिरीच्या कठड्यावर जाऊन अडकली. सुदैवाने बस विहिरीत कोसळण्यापूर्वीच थांबल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना वडकी परिसरात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला सरकत थेट विहिरीच्या दिशेने गेली आणि कठड्यावर अडकून राहिली. बसचा पुढील भाग विहिरीच्या बाजूला झुकल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आणि उपस्थितांनी तत्परता दाखवत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बचावकार्यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. बस चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले याचा तपास सुरू असून या प्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत आहे.

ही घटना पुन्हा एकदा शालेय वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणणारी ठरली असून वाहनांची नियमित तपासणी आणि चालकांची दक्षता किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून देणारी आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!