पुण्याच्या भीमाशंकर देवस्थानचा मोठा निर्णय; दर्शनासाठी ऑनलाईन पासची सक्ती शिथिल
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी असलेली ऑनलाईन पासची सक्ती शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे भाविकांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पास काढताना भाविकांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड, पास उपलब्ध नसणे किंवा नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत असल्याने भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. यामुळे मंदिर परिसरातही गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
भाविकांचा वाढता त्रास लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या व्यवस्थेनुसार दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना ऑनलाईन पासशिवाय थेट प्रवेश दिला जाणार आहे. या कालावधीत दर्शनासाठी कोणत्याही पूर्वनोंदणीची आवश्यकता राहणार नाही.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून विशेषतः दूरवरून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








