पिंपरी चिंचवड शहरात १५ टक्के पाणी कपात लागू, पवना धरणात केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावल्याने महापालिकेने शहरात १५ टक्के पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे धरणातील पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली असून सध्या स्थितीत पवना धरणात केवळ ११ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
या गंभीर पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभाग पुणे यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दि. १९ जून २०२६ पासून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू केली आहे.
धरणातील चिंताजनक पाणीसाठा पाहता महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच करावा, पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टाळावा, तसेच पाणी अत्यंत काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावे, अशी नम्र विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. महापालिकेच्या या आवाहनावर शहरातील नागरिकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, पाण्याच्या नियोजनासाठी शहरातील मोठी बांधकामे आणि गाड्या धुण्याचे वॉशिंग सेंटर पूर्णपणे बंद करण्यात यावेत अशी मागणीही आता नागरिकांमधून समोर येत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







