मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा तूर्तास पालिका उचलणार; तीव्र विरोधानंतर प्रशासन नरमले.


मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा तूर्तास पालिका उचलणार; तीव्र विरोधानंतर प्रशासन नरमले.

पिंपरी, दि. ३० : पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज शंभर किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, मंगल कार्यालये, वसतिगृहे, कंपन्या, कँटीन आणि खानावळींनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा त्यांचा कचरा १ जुलैपासून उचलला जाणार नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, या निर्णयाविरोधात सोसायटीधारक आणि विविध संघटनांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने आपली भूमिका शिथिल करत ओला कचरा तूर्तास उचलला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दररोज शंभर किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या संस्था आणि सोसायट्यांनी स्वतःच्या स्तरावर कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरातील सुमारे १ हजार १५५ मोठ्या संस्था आणि सोसायट्या या निकषांमध्ये येतात. या संस्थांकडे कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध आहे का, याचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. ज्या संस्थांकडे प्रक्रिया यंत्रणा उपलब्ध असेल, त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

महापालिकेच्या या निर्णयाला सोसायटी फेडरेशन आणि विविध रहिवासी संघटनांनी विरोध दर्शविला. शहरात पुरेशा कचरा प्रक्रिया सुविधा उपलब्ध नसताना आणि पर्यायी व्यवस्था न देता कचरा उचल बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सध्या ओल्या कचऱ्याची उचल सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप डांगळे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या नियमांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सोसायटीधारकांकडून आलेल्या आक्षेपांची दखल घेऊन तूर्तास ओला कचरा उचल सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील निर्णय आयुक्त आणि संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाईल.

या निर्णयामुळे शहरातील हजारो नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रतिनिधी:  शाम शिरसाठ पुणे.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!