महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; रुपाली चाकणकर यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या आगामी चित्रपटावरून नवीन वाद निर्माण झाला असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते आणि कलाकारांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. जिवंत व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारताना संबंधित व्यक्तीची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा दिला असून, या प्रकरणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही जिवंत व्यक्तीचे चित्रण करताना संबंधित व्यक्तीची संमती घेणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
याच प्रकरणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे, रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे, अंजली दमानिया, आशा मिरगे आणि रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याचे नेमके स्वरूप आणि त्यावरील पुढील सुनावणीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे




